उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यांचा हा ११ वा अर्थसंकल्प होता. राज्य सरकार लवकरच नवे औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी केली.
नव्या औद्योगिक धोरणातून ५ वर्षात ४० लाख कोटींची गुंतवणूक, ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवले आहे. केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवे कामगार धोरण राज्य सरकार तयार करणार आहे. सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या ५ वर्षात साध्य करण्यासाठी गृहनिर्माण धोरण लवकरच सरकार जाहीर करणार आहे. प्रत्येकाला ५ किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे.
विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अजित पवार यांनी आज जाहीर केलं. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर उभारलं जाणार आहे. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार, गडचिरोलीतल्या आरमोरीत रेशीम कोष खरेदी विक्री बाजार उभारली जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४७ पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७ सरकार तयार करणार आहे
एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून ६ हजार डिझेल बसचे CNG, LNG मध्ये रुपांतर करण्याचं काम सुरू आहे, असं ते म्हणाले.