राज्य शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती या नावाने महिलांची एक विशेष समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा तसेच महिला दिनानिमित्त महिलांबाबतच्या विविध विषयांवरील विशेष चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभर सर्व ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून महिला दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातील सर्व महामार्गांवर प्रत्येक पन्नास किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह आणि त्या शेजारी विक्री स्टॉल उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती देखील तटकरे यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून एकही पात्र महिला वगळली जाणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.