राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. पुढच्या पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं.
अंबरनाथ, बदलापूर येथील बारवी धरणासाठी संपादित करायच्या वाढीव ६१ हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया लवकर सुरू करून ती पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतचा प्रश्न किसन कथोरे यांनी उपस्थित केला होता.
शिवाजी विद्यापीठाचं उप केंद्र सांगली जिल्ह्यात खानापूर इथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठी नवीन अभ्यासक्रम आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली