बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यामुळे संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. तसंच विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं अशी सूचना केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुगल शासक औरंगजेब याच्याशी तुलना केल्याबद्दल भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत निषेध केला. हा महाराष्ट्राचा अपमान असून सपकाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं.