डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ % कर लावण्याचा निर्णय मागे

राज्यात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला. त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.  

 

यूपीएससीसीच्या धर्तीवर एमपीएसीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने  घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. हा निर्णय २०२२ मध्येच झाला होता, मात्र लगेच अंमलबजावणी करू नये अशी मागणी झाल्यानं याच्या अंमलबजावणीला २०२५ पर्यंत मुदत दिली होती. काही मूठभर शिकवणी वर्ग या विरोधात परीक्षार्थींना फूस लावत आहेत, मात्र ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या हिताची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. 

 

सरकारच्या विभागांनी आकृतीबंध तयार करून मागणी केल्यानंतर एमपीएससीकडून परीक्षा घेण्यात येते, असं सांगत, दिरंगाई करून कोणत्याही परीक्षार्थींवर सरकार अन्याय करणार नाही, असं मंत्री आशिष शेलार यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. पूर्व परीक्षेसाठी देण्यात आलेले ईडब्लूएस आणि एसईबीसीचे पर्याय मुख्य परीक्षेसाठी हे पर्याय लिंकवर उपलब्ध करून देण्यात येतील, तसंच त्यांना एनसीसी प्रमाणपत्र देखील मुलाखतीच्या वेळी ग्राह्य धरलं जाईल, असं शेलार यांनी सांगितलं.

 

आंबिवली इथल्या इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ले झाल्या प्रकरणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जाईल, तसंच मकोका लावला जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं. या परिसरात अनधिकृत बांधकामे असतील तर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. प्रवीण दरेकर, अनिल परब यांनी हा प्रश्न विचारला होता.

 

भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडला. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गाऊन त्यांचा अपमान केला. त्याचं समर्थन अंधारे यांनी केलं. हा सभागृहाचा अपमान आहे, असं दरेकर म्हणाले. हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवल्याचं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा