विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरुवात केली. सरकारची कारवाईची मानसिकता नसल्यानं गुन्हेगारांना अभय मिळू लागलं आहे, असं ते म्हणाले. बीडमध्ये मस्साजोगच्या सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला गेलेला नाही, सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं स्पष्ट होऊनही आरोपींविरोधात सरकारानं कारवाई केलेली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोललं की कारवाई केली जाते, मात्र महामानवांचा अपमान केल्यावर तत्परतेनं कारवाई होत नाही, अशी टीका त्यांनी केली. अनेक प्रकरणांत बुलडोझर लावून मालमत्तेचं नुकसान केलं जातं. यामुळे राज्याची प्रतिमा मलीन होते असं ते म्हणाले. हास्य कलाकार कुणाल कामरा यांनी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसुल करायला पाहिजे, असं दानवे म्हणाले.
कोकणात रायगडमधल्या रेवसपासून सिंधुदुर्गातल्या रेडी पर्यंतच्या ५२३ किलोमीटरच्या सागरी महामार्गाचं नूतनीकरण करून हा मार्ग चौपदरी ग्रीनफिल्ड मार्ग करणार असल्याचं, मंत्री दादा भुसे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.