विधानसभेत आज विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.
जमीनग्रहण झाले नसताना, इतर विभागांच्या परवानग्या आलेल्या नसतानाही बेकायदेशीररीत्या अनेक नवीन मार्गांच्या कामाचे कार्यादेश घाईनं देण्यामागे नेमके कोणाचे आदेश होते, कोणाला रस होता असा सवाल जयंत पाटील यांनी यावेळी केला. ठाणे घोडबंदर किनारा मार्ग, मुंबईतला वर्सोवा भाईंदर किनारा मार्ग, यात हे प्रकार घडले असून निविदा रकमेपेक्षा जास्त दरानं ही कामं दिली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढणारे सोलापूरकर, कोरटकर बाहेर मोकाट कसे फिरतात, त्यांना संरक्षण का दिलं जातं, वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीला झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत परवानगी कशी मिळाली, अनुदान देण्यासाठी शाळांना मंजुरी देण्याचे अधिकारी नसणारे त्या नामंजूर कशा करतात असे अनेक सवाल उपस्थित करत, सरकारनं याची उत्तरं द्यावीत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
परभणी येथील सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दलचं प्रश्नचिन्ह कायम आहे, बीडमधल्या देशमुख हत्येचे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत, बदलापूर इथल्या घटनेचा आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील, असे अनेक प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले.
नागपूर दंगलीत पोलिसांनी बघ्याची भूमिका बजावली आहे, प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्यावेळी त्यावरची चादर ताब्यात घेतली असती तर हा प्रकार घडलाच नसता, त्यामुळे सरकारच याला जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. आमदारांना दिलेले वाय दर्जाचं संरक्षण खासगी व्यक्तीना कसं दिलं. त्याचा खुलासा सरकारनं करावा अशी मागणी यावेळी केली.