महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याविरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्याने हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानानं मंजूर केला.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांनी तसंच जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. नार्वेकर यांची ओळख विद्वान आणि संयमी अशी असून राज्याच्या इतिहासात सलग दोनदा पद भुषवणारे ते चौथे व्यक्ती आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. आधीच्या कार्यकाळात अध्यक्षांनी ज्याप्रकारे निःपक्षपातीपणे कामकाज चालवलं तीच परंपरा पुढे सुरू राहील असंही फडणवीस म्हणाले.
त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी जयंत पाटील, विनय कोरे, सुनील शेळके आणि उत्तम जानकर यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा परिचय करून दिला.