महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेत केलं. समृद्धी महामार्ग, रेल्वेचं आधुनिकीकरण, औद्योगिक पार्क, टेक्सटाइल पार्क इत्यादींचा उल्लेख करून यामुळे या भागातल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकासासोबतच परंपरेकडेही आपल्या सरकारचं लक्ष असल्याचं सांगून पालखी महामार्ग, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मराठवाड्यातला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं काहीही केलं नाही, उलट महायुती सरकारच्या काळात सुरू केलेल्या योजना बंद पाडल्या असा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस विविध समुदायांमध्ये फूट पाडत असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यास भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केली जातील, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली.