विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरुवात झाली. विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली.
अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यात अपक्षांचे ६ अर्ज दाखल झाले. यात फलटण विधानसभा मतदारसंघासाठी दोन, कोरेगाव मतदार संघासाठी दोन, कराड उत्तर एक, सातारा मतदारसंघासाठी एक अर्ज दाखल झाला. परभणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल पाशा गफार खुरेशी यांनी उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून इतर १८ उमेदवारांनी ५२ अर्ज घेतले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जफर अली खान पठाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
नाशिकच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज १७ उमेदवारांनी २७ अर्ज घेतले असले मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही.
नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचे अर्ज वितरण आणि भरलेले अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात आज दिवसभरात इच्छुक उमेदवारांनी २१६ अर्ज घेतले असले तरी एकही अर्ज दाखल झालेला नाही. धुळे जिल्ह्यात माध्यम सनियंत्रण समितीने पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवावं असे आदेश निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज धुळ्यात दिले.