विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी निवडणूक निरीक्षक संबंधित स्थळांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. रत्नागिरीतल्या माध्यम कक्षाला आणि निवडणूक नियंत्रण कक्षाला निवडणूक निरीक्षक, लेखा निरीक्षक आणि निवडणूक निरीक्षक – पोलीस यांनी भेट देऊन पाहणी केली. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत छापील, तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि उमेदवारांच्या समाजमाध्यम खात्यांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, मजकूर आणि पेड न्यूज, तसंच अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या. या वेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अकोला इथंही निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा निवडणूक कार्यालयात, तसंच निवडणूक निर्णय कार्यालयांत विविध कक्षांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. अकोला पूर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, आचारसंहिता कक्ष, साहित्य कक्ष, परवानगी कक्ष, तक्रार निवारण कक्ष, तसेच जिल्हा निवडणूक कार्यालयातील निवडणूक कक्ष, माध्यम संनियंत्रण कक्ष आदी विविध कक्षांची पाहणी निरीक्षकांनी केली. यावेळी त्यांनी निवडणूकविषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तरतुदीचे काटेकोर पालन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, नोंदी रजिस्टर आदी बाबींची तपासणी निरीक्षकांनी केली. यावेळी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.