जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बाेलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनंच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, याउलट आरक्षण आणि संविधान संपवण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेसवर करत आहेत, असं ते म्हणाले.
मोदींची हवा संपली असून, त्यांच्या सभांना जनतेचा प्रतिसादच नाही, याउलट राहुल गांधी यांच्या सभांना मात्र प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी उद्या चिमूर आणि धामणगाव रेल्वे इथं प्रचार सभा घेणार आहेत. तर, प्रियंका गांधी उद्या शिर्डी आणि कोल्हापुरात, तसंच परवा गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रचारसभा घेतील, असे चेन्नीथला यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर सोयाबीन शेतकऱ्यांना ७ हजार रुपये भाव देईल, याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.