राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १३ ते १८ नोव्हेंबर या काळात काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक आज झाली, त्यावेळी चेन्नीथला यांनी ही माहिती दिली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १३ ते १८ नोव्हेंबर या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. जेष्ठ नेते राहुल गांधींच्या सभा १२,१४ आणि १६ या तारखांना तर प्रियांका गांधींच्या सभा १३,१६ आणि १७ ला होणार आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याही सभा होणार असल्याचं चेन्नीथला यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
महाविकास आघाडीचा जाहिरनामा १० नोव्हेंबरला प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती देताना चेन्नीथला यांनी कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणी सुरु आहे. गॅरंटी जाहीर करताना आर्थिक तरतूद कशी केली जाईल यावर सखोल चर्चा आणि अभ्यास करुनच त्या जाहीर केल्या आहेत, असंही रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधातले अर्ज मागे घेतले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती भाजपाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. या विरुद्ध काँग्रेस निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.