महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. महिलांना दरमहा तीन हजार रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या महालक्ष्मी योजनेचा तसंच बेरोजगारांना ४००० रुपये अर्थसहाय्याचा त्यात समावेश आहे. महिलांना मोफत बस प्रवास, रुग्णांना मोफत औषधं, अशी आश्वासनं राहुल गांधी यांनी दिली. भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमांवर त्यांनी टीका केली. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते.
प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांची नेमणूक झाली आहे.