डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केलं. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.

 

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते.

 

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी, तर याच मतदार संघातून राष्ट्रवादी कॉँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी, शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांनी तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला.

 

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल उपस्थित होते. मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तर, वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला.

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमदेवार बच्चू कडू यांनी अचलपूर-चांदूरबाजार मतदारसंघातून अर्ज दाखल केला. नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून, तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक नाईक यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या सर्व उमेदवारांनी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितेश राणे यांनी कणकवलीतून, तर निलेश राणे यांनी कुडाळ मधून उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

 

सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून भाजपतर्फे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड दक्षिणमधून माजी मुख्यामंत्री पृथ्वीसराज चव्हा ण यांनी काँग्रेसतर्फे, पाटण येथून शिवसेनेच्याज वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उध्दवव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या् वतीनं हर्षद कदम यांनी तर महाविकास आघाडीने तिकिट नाकारल्याानं सत्यहजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून, महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार मनिषा वायकर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा खासदार रविंद्र वायकर, शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर आदी उपस्थित होते.

 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शेखर निकम यांच्याबरोबर खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी बाळ माने यांनी शक्तिप्रदर्शन केलं.

 

सांगली जिल्ह्यातील पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस पक्षाकडून तर जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी शक्ती प्रदर्शन करत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्यजित देशमुख आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांनी अर्ज दाखल केला.

 

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल मालेगाव बाह्य मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक शहर-पूर्व मतदार संघातून आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले, नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चीम मतदार संघातून आमदार सीमा हिरे या तिन्ही भाजप आमदारांनी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले.

 

नांदगाव मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, कॉँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिस अहमद यांनी काल वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना कालही विविध पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल सात उमेदवारांची यादी जाहीर केली. तर भारतीय जनता पक्षानं 25 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपानं चार जागा मित्र पक्षांना देण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेनं 15; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 18 तर कॉँग्रेसनं राज्यातल्या विविध मतदार संघांसाठी चार उमेदवारांची काल घोषणा केली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा