डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अनेक मतदारसंघात पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा, अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस

राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत २५९ उमेदवार घोषित झाले असून, यामध्ये काँग्रेसचे ९९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ७६ उमेदवारांचा समावेश आहे.

 

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, तर अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

शिवसेनेनं २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण – आनंद तिडके पाटील, परभणी – आनंद भरोसे, वरळी – मिलिंद देवरा, कुडाळ – निलेश राणे, तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

काँग्रेसनं १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप, परळी – राजेसाहेब देशमुख, तर अणुशक्तीनगरमधून फहद अहमद, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. भोकर मतदारसंघातून – साईप्रसाद जटालवार, नांदेड उत्तर – सदाशिव आरसुळे, तर परभणी मतदारसंघातून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा