डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल

राज्यात आज दुसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरायला उमेदवारांची गर्दी दिसून आली. 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्याआधी त्यांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक रॅली काढली, तसंच त्यानंतर झालेल्या सभेला संबोधित केलं आणि पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला. 

 

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून, आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तर  शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवडा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा नेते राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून अर्ज भरला.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी आज शिवडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.

 

कर्जत जामखेड मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम शिंदे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे, शिर्डीमधून डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूरमधून संतोष भाऊसाहेब कांबळे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मेघा डोंगरे यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. अकोला पूर्वमधून भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर, बदनापूरमधून महाविकास आघाडीकडून आज बबलू चौधरी यांनी तर भोकरदनमधून शरद पवारांनी उमेदवारी दिलेल्या चंद्रकांत दानवे यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. 

 

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्षाकडून प्रत्येकी १ आणि २ अपक्ष असे एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. परंडा विधानसभा मतदारसंघात ३ अपक्ष उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांनी अर्ज भरला. उमरगा विधानसभा मतदारसंघात १८ तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ५० अर्ज आज खरेदी केले गेले परंतु दोन्ही मतदारसंघात आज एकही अर्ज दाखल झाला नाही. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सावंतवाडीतून तिकीट नाकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज सावंतवाडीतून दाखल केला. दरम्यान हा अर्ज डमी असून अधिकृतरीत्या २९ तारखेला सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजन तेली उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांच्या पक्षाचे सावंतवाडी संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितलं. यवतमाळच्या वणी मधून मनसे नेते राजु उंबरकर, नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम यांनी तर इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी आज नामांकन अर्ज जमा केला. 

 

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी विधानसभा क्षेत्रात रामदास मसराम तर गडचिरोली मतदारसंघातून डॉ. देवराव होळी यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं. अहेरी मतदारसंघात आज एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १८६ अर्ज खरेदी केले गेले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा