राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून, काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, आंबेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून तर काँग्रेच्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबईत मलबार हिल इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून अर्ज दाखल केला.
ठाणे मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग मतदारसंघातून अर्ज दाखल केला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
अहिल्या नगर जिल्ह्यातल्या अकोल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे, तर पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी अर्ज दाखल केला.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी तर कळमनुरी इथून शिवसेनेचे संतोष बांगर यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांनी तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमधल्या भूम परंडामधून अर्ज दाखल केला.
शिवसेनेच्या संजय राठोड यांनी दिग्रसमधून तर भाजपाच्या विनोद अग्रवाल यांनी गोंदियातून अर्ज दाखल केला. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी पूर्व नागपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.