महाराष्ट्रात अद्यापही सरकरस्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आज नवी दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व, अर्थात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलं. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. मात्र या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं.
पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेद्वारे सर्व निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही दिल्लीत दाखल झाले असून सत्ता स्थापनेबद्दल खेळीमेळीनं निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.