महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली; त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या पहिल्या दिवशी, राज्यातून 57 उमेदवारांचे 58 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 45 आणि शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी, काल रात्री घोषित करण्यात आली.
महाविकास आघाडीतल्या शेतकरी कामगार पक्षानं काल रायगडमधील चार उमेदवारांसह आपले पाच उमेदवार जाहीर केले. दरम्य़ान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा, उमेदवारी मिळालेल्यांचे प्रचार, तर दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांचे दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश, अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.