विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. त्यानुसार राज्यात सरासरी ६६ पूर्णांक ५ शतांश टक्के मतदान झालं. यात कोल्हापूरच्या करवीर मतदार संघात सर्वाधिक ८४ पूर्णांक ९६ शतांश, म्हणजे जवळजवळ ८५ टक्के मतदान झालं. त्याखालोखाल चिमूरमधे ८१ पूर्णांक ९५ शतांश, नवापूरमधे ८१ पूर्णांक १५ शतांश, ब्रह्मपुरी ८० पूर्णांक ५४ शतांश, तर सिल्लोड मतदार संघात ८० पूर्णांक ८ शतांश टक्के मतदान झालं.
राज्यभरात यावेळी मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला, तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदान केलं.
यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहे. मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल.