राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.
२८८ विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्रं काम करणार आहेत, शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे ६ हजार ६०० पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. मतमोजणीच्या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. दुपारी बाराच्या सुमाराला पहिले निकाल हातात येतील, मात्र मतदारसंघाच्या आकारमानानुसार यात फरक पडू शकतो. संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं.
महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच देशातल्या ४८ विधानसभा मतदारसंघातल्या तसंच लोकसभेच्या २ मतदारसंघातल्या निवडणुकांची मतमोजणीदेखील उद्या होणार आहे. महाराष्ट्रात नांदेड आणि केरळात वायनाड या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती.
विधानसभेसाठी उत्तरप्रदेशातल्या ९, राजस्थानातल्या ७, पश्चिमबंगालमधल्या ६, आसाममधे ५, बिहार आणि पंजाबमधे प्रत्येकी ४, कर्नाटकात ३ मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. केरळ, मध्य प्रदेश आणि सिक्किममधे प्रत्येकी दोन जागांसाठी तर छत्तीसगड, गुजरात, आणि उत्तराखंडमधे प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली.