विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी पोहोचले आहेत. सर्व केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र दल आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्र रवाना झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाने १३४ बस सज्ज ठेवल्या आहेत. या गाड्यांमधून निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर नेण्यात येत आहे. तसंच ५ हजार २३६ निवडणूक कर्मचारी आणि १४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातल्या बाराशे ८५ मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य नेण्यात येत आहे. निवडणूक साहित्य नेण्यासाठी जिल्हा मुख्यालयात आज सकाळपासून गर्दी दिसून आली.
नाशिक जिल्ह्यातल्या ४ हजार ९२२ मतदान केंद्रासाठी २७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर विविध सुविधा देण्यात आल्या असून महिला मतदारांसाठी विशेष मतदान कक्ष उभारण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी साहित्यासह रवाना झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी सोळाशे पोलीस, साडे चौदाशे होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
धुळे जिल्ह्यातल्या सतराशे ५३ मतदान केंद्रावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातल्या १८ लाखापेक्षा जास्त मतदारांना मतदान माहिती चिठ्ठीचं वाटप केलं जात आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.