महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने मतदान पथकं रवाना होत आहेत.