विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यात आज ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक रोहन घुगे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे कणकवली शहरामध्ये आज लोकशाही दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच, रॅली आणि पथनाट्याचं सादरीकरणही करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.
धुळे शहरात मतदार जनजागृतीसाठी प्रभातफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय, कवडा इथल्या दिलीप दार्वेकर या शिक्षकांनी मतदान जागृतीसाठी विशेष रांगोळी रेखाटली.
पालघर जिल्ह्यातही स्वीप कार्यक्रमांतर्गत येत्या १७ नोव्हेंबर रोजी मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.