वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज गृहमतदान होत आहे. निवडणूक अधिकारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवत आहेत. गृहमतदानासाठी रिसोड मतदारसंघात ५४६, वाशिम मतदारसंघात ४३२ तर कारंजा मतदारसंघात ४७९ मतदारांनी नोंद केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. विविध तालुक्यात मिळून सुमारे ५ हजार ३१६ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासूून गृहमतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात दोन हजार ८६२ नागरिकांनी गृहमतदानासाठी नोंद केली आहे.
जळगाव जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेनंं मतदान जागृतीसाठी रील्स बनवण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. उत्तम रील्स बनवणाऱ्यांना पारितोषिक दिलं जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
धुळे शहरात १० नोव्हेंबर रोजी गृहमतदान होणार आहे. यासाठी चौदा पथकं नेमली असून प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक आणि एक व्हिडीओ ग्राफर असणार आहे. जे मतदार या दिवशी मतदान करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.