विविध राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना राज्यात सुरुवात झाली आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून आला.
उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं जनसंपर्क रॅली काढून प्रचाराचा प्रारंभ केला. आपल्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून मतदारच आपल्याला निवडून आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत शिर्सुफळ गावात पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या समर्थनार्थ प्रचार सभा घेतली. राज्यसभेचा आताचा कार्यकाळ संपल्यावर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
कोल्हापुरातल्या राधानगरी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रचारसभा घेतली. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याच्या हेतूनेच महाविकास आघाडीचं सरकार पाडल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
साताऱ्यात कोरेगाव इथं शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली.
नागपूर उत्तर मतदारसंघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी देखील आज शहराच्या विविध भागात प्रचार केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिल्यामुळे महायुतीचाच फायदा होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषेदत व्यक्त केला.
धुळे जिल्ह्यात निवडणूक लढविणार्या अपक्ष उमेदवारांना आज चिन्ह वाटप करण्यात आलं.