महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरच्या अंतिम आकडेवारीनुसार २८८ पैकी २३० जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला १३२ जागांवर विजय मिळाला असून शिवसेनेला ५७, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीतल्या प्रमुख तीन पक्षांना फक्त ४६ जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २० जागा मिळाल्या, काँग्रेसला १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागांवर जनतेनं कौल दिला. समाजवादी पक्ष, जनसुराज्य पक्ष आणि अपक्षांना प्रत्येकी दोन जागी विजय मिळाला आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर बाजी मारली आहे.
Site Admin | November 24, 2024 3:18 PM | Maharashtra Assembly Election 2024