डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६५ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल. त्यानुसार या टक्केवारी आणखी १-२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत ७१ पूर्णांक ६९ टक्के मतदारांनी मताधिकार बजावला होता. 

 

राज्यात सर्वाधिक सव्वा ७६ टक्के मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली. अहिल्यानगर, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जालना, परभणी, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही ७० टक्क्यांपेक्षाही जास्त मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ५२ टक्के मतदान मुंबई शहर या जिल्ह्यात नोंदवलं गेलं. मुंबई उपनगर जिल्ह्यात ५५ पूर्णांक ७७ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. ठाण्यात ५६ टक्के मतदान झालं. हे ३ जिल्हे वगळता इतरत्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. 

 

मतदारसंघाचा विचार करता चिमूर आणि कागलमध्ये ८१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. राज्यातल्या २७ पेक्षा जास्त मतदारसंघात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ४४ पूर्णांक ४९ टक्के मतदान कुलाबा मतदारसंघात झालं. अंबरनाथ, मुंबादेवी, धारावी आणि भिवंडी पूर्वमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झालंय.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा