विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरवापर झाले. त निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली.
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी दिली. कांदे यांनी मतदारांना एका बसमध्ये बसवून मतदान केंद्रावर आणल्याबद्दल भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद झाला.
मुंबईतल्या दिंडोशी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली.
वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांना आज मारहाण झाली. भाजपा कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप कराळे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाला.
बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातल्या घाटनांदूर, चोथेवाडी, मुरंबी, जवळगाव या गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदान यंत्रांची तोडफोड झाली, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांवर आरोप केले आहेत.
बारामतीतल्या एका मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आरोप फेटाळून लावले.
ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात मद्य आणि पैसे वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.