राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तिविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा केलेला दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून, त्याला कोणत्याही कोणत्याही नेटवर्क, वाय – फाय किंवा ब्लूटूथला जोडता येत नाही, त्यामुळे या यंत्रासोबत छेडछाडीची कोणतीच शक्यता नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रांवर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे.