डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधीमंडळात दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब याच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचा आरोप करत सत्ताधारी आमदार महेश लांडगे, अतुल भातखळकर, गुलाबराव पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी केली. गदारोळ वाढल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं होतं. कामकाज सुरू झाल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबु आझमी हे देशद्रोही असून त्यांचं निलंबन करण्याची मागणी केली. आझमी यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे असं ते म्हणाले. 

 

अबू आझमी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतही निवेदन केलं. यावर सरकारने कारवाई करावी असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले. त्यानंतरही सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं सभापतींनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं. 

 

कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. सत्ताधारी सदस्यांचं आंदोलन सुरूच असल्याने सभापतींनी कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा