प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे १६ गाड्या चालवत असून या सर्व स्थानकांवरची परिस्थिती सुरळीत आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केलं आहे. राज्यातून दररोज सुमारे २० विशेष आणि नियमित गाड्या प्रयागराज आणि त्या भागासाठी चालवल्या जात आहेत. इथल्या रेल्वेस्थानकांवर प्रशासनाचं बारीक लक्ष असून गर्दी जास्त वाढल्यास तिथून तातडीनं अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. गरज पडल्यास आणखी रेल्वेगाड्या सोडण्याचीही रेल्वे प्रशासनाची तयारी आहे, असंही नीला यांनी सांगितलं.
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवायचं आवाहन केलं आहे. भाविकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध रेल्वेस्थानकांवर मदत केंद्रंही स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.