उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळा काल समाप्त झाला. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभामध्ये ६६ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. भारतीय वायु दलानं घाटांवर पुष्पवृष्टि करुन भाविकांना संस्मरणीय आनंद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक, संत आणि कल्पवासी यांना शुभेच्छा दिल्या.
भाविकांनी संपूर्ण जगाला राष्ट्रीय एकता आणि समर्पणाचा संदेश दिला असल्याचं ते म्हणाले. महाकुंभ २०२५ हा इतिहासातील अध्यात्मिकता आणि मानवी संमेलनाचं एक सर्वात मोठं केंद्र ठरला.
महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व ४८ दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने कोट्यवधी लोकांशी संपर्क साधला. देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीनं या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं तर कुंभवाणीमार्फत कमीतकमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल – गौर यांनीही प्रशंसा केली आहे.