आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला पाठिंबा देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणलं तर महाविकास आघाडीचे पक्ष त्याला पाठिंबा देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा असेल, निकालानंतर एकत्रित बसून मुख्यमंत्री ठरवू, असं पुनर्प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केलं.
लोकसभेत यश आलं म्हणजे राज्यघटनेवरचं संकट टळलं, असं नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मेळाव्यात दिला. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत त्यांना संवैधानिक संस्था, विचारधारा आणि तरतूदी यांच्याबाबत आस्था नाही, असा आरोप त्यांनी केला.
हे बेकायदा सरकार जनतेला उलथवून लावायचं आहे, असं आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं.
सर्वांना कामाला लागता यावं यादृष्टीनं राज्यात जागावाटपाची घोषणा लवकरात लवकर करावी, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलं.
मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू, असं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.