प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्यसरकारने स्थापन केला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग आणि महासंचालक प्रशांत कुमार यांनी काल संगमस्थळाला भेट दिली.
पुढील अमृतस्नानाच्या दिवशी प्रशासनानं सुरक्षा यंत्रणांचं नियोजन चोख करावं, गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त अधिकारी तैनात करावेत, सुरक्षा व्यवस्थांमध्ये काहीही त्रुटी राहणार नाही याची खातरजमा करावी अशा सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मार्गिकेत बदल करण्यात आला आहे. मात्र वाहनांवर बंदी घालण्यात आल्याच्या वृताचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी खंडन केलं आहे.
प्रयागराजमध्ये वाहनांच्या प्रवेशावर 4 फेब्रुवारीपर्यंत बंदी असेल. असा संदेश समाजमाध्यमावर फिरत असल्याच्या पार्शवभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी वाहतूक नियमनात कोणताही बदल होणार नाही. वसंतपंचमीला अमृत स्नान असल्यानं प्रयागराजमध्ये केवळ 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी वाहन प्रवेश प्रतिबंधित असेल असं एका व्हिडीओ संदेशात त्यांनी स्पष्ट केलं.