उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अमृतस्नानासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर आज संवाद साधला आणि महाकुंभमधील आजच्या नियोजनाचा तसंच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जनहितासाठी काही वेळापुर्वी आखाड्याचं स्नान रद्द करण्यात आलं आहे. गर्दीमुळे काही भाविक महिलांची प्रकृती खालावल्याचं वृत्त आहे. कुंभमेळा परिसरांत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सात स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून वाहन विरहित क्षेत्र तसंच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीचं व्हिआयपी विरहित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आरोग्य यंत्रणा, हवाई रुग्णवाहिका आदी व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, यात्रेकरुंची गर्दी लक्षात घेता, भाविकांनी ते कुंभमेळ्याच्या ज्या भागात आहेत तिथल्या नजिकच्या घाटावर स्नान करावं. संगमस्थळी जाण्याचा अट्टाहास करु नये अशी विनंती मेळा प्रशानानं आज सकाळी केली आहे. देशभरातील विविध ठिकाणांहून 190 विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Site Admin | January 29, 2025 10:17 AM | Maha Kumbh 2025 | Mauni Amavasya
महाकुंभ : मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी भाविकांची गर्दी
