संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर नेराळे यांचं काल मुंबईत लालबाग इथल्या राहत्या घरी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
लालबाग इथल्या प्रसिद्ध हनुमान तमाशा थिएटरचे मालक असलेल्या नेराळे यांचा लहानपणापासून तमाशा या कलेशी संबंध आला. तमाशा कलेला जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम नेराळे यांनी केलं. गाढवाचं लगीन, आतून कीर्तन वरून तमाशा, राजकारण गेलं चुलीत, उदं गं अंबे उदं अशी अनेक लोकनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली. १९७० आणि ८०च्या दशकात नेराळे यांच्या हनुमान थिएटरमध्ये रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लीला गांधी ते मधु कांबीकर अशा कलावंतांच्या संगीतबाऱ्या रंगल्या.
शाहीर नेराळे यांनी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना केली. या माध्यमातून शाहिरांचे अनेक प्रश्न सोडवले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित सातारा, सांगली, लातूर, नाशिक, जुन्नर इथल्या तमाशा शिबिरांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.