पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी, यातूनच पुढे उत्तम साहित्यिक घडतील, असं मत ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आज मांडलं. मुंबईच्या जनरल पोस्ट कार्यालयानं आयोजित केलेल्या ‘पत्रोत्सव २०२४’ या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय डाक विभागाच्या ‘ढाई आखर’ या पत्रलेखन स्पर्धेअंतर्गत शालेय मुलांसाठी मुंबई जनरल पोस्ट कार्यालयानं पत्रं लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवल्या. मुंबईत राहणाऱ्या आपल्या बहिणीला गावातल्या घडामोडी पत्रांतून कळवण्याच्या प्रवासातून आपल्यात दडलेला लेखक आपल्याला गवसला, असं सांगून मुलांना उत्तम वाचक, लेखक होण्याचं आवाहन त्यांनी केलं. डाक सेवा बोर्डाच्या सदस्य मंजू कुमार, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह, मुंबई सर्कलच्या प्रमुख सुचिता जोशी आणि इतर यावेळी उपस्थित होते.
Site Admin | December 17, 2024 5:38 PM | Madhu Mangesh Karnik