डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे पंधरावा भाग होता.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी उदाहरणादाखल डिजीटल अटकेशी संबंधित फसवणूकीच्या फोन कॉलचं ध्वनीमुद्रण श्रोत्यांना ऐकवलं, फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती आणि अशा वेळी आपण घाबरून न जायची खबरदारी याविषयी देखील त्यांनी श्रोत्यांना समजावलं. डिजीटल अटक अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही, तर ही फसवणूक आहे, अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत असं ते म्हणाले. या सगळ्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारं परस्पर सहकार्यानं काम करत असून, त्यांच्यातल्या समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजातील सगळ्याच्या प्रयत्नांनीच आपण या आव्हानाचा सामना करू शकतो असं ते म्हणाले.
सायबर फसवणुकीला बळी पडलेल्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत त्याबाबत माहिती पोहचवावी, जनजागृतीसाठी सेफ डिजीटल इंडिया या हॅशटॅगचा वापर करावा, अशा मोहिमांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. अशा घटनांविरोधात नागरिकांनी १९३० या राष्ट्रीय सायबर मदत क्रमांकावर अथवा सायबर क्राइम डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर कळवावं अशी माहितीही त्यांनी दिली.
आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर अॅनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी जगभर नावाजली जाते, त्यामुळेच भारतातील ॲनिमेशन स्टुडिओज, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले. ॲनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या व्ही आर अर्थात आभासी पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या २८ ऑक्टोबरला जागतिक ॲनिमेशन दिवस साजरा होणार असून, यानिमीत्तानं देशाला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी केलं.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतानं लडाखमध्ये हानले इथं आशियातल्या सर्वात मोठ्या MACE या इमेजिंग टेलिस्कोपची स्थापना केल्याविषयीदेखील सांगितलं.
सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षाला येत्या ३१ ऑक्टोबरपासून, तर १५ नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला सुरुवात होणार असल्याचं स्मरण त्यांनी श्रोत्यांना करून दिलं. या दोन्ही महापुरुषांसमोरची आव्हानं वेगवेगळी होती, पण देशाची एकता हेच दोघांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. बिरसा मुंडा वन फिफ्टी आणि सरदार वन फिफ्टी या हॅशटॅगसह देशाच्या विविधतेतल्या एकतेचा, वारश्याचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं.
देशभरात शारीरिक तंदुरुस्तीविषयी वाढत चाललेल्या जाणिवेच्या उर्जेचा आपल्याला अनुभव येत असल्याचं ते म्हणाले.
भारताच्या कला आणि संस्कृतीबद्दल जगभरात असलेल्या आकर्षणाचाही उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला.