गेल्या आर्थिक वर्षात देशभरातल्या डिजिटल पेमेंट व्यवहारात ४४ टक्के वाढ होऊन ते १८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. तात्काळ पेमेंट सेवा आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक पथकर जमा योजनेनं लक्षणीय प्रगती केली असून देशभरातल्या डिजिटल पेमेन्टच्या वाढीमागे यु पी आय पद्धतीचं यश कारणीभूत असल्याचं ते म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी ६ टक्के असणारा देशातला बेरोजगारीचा अंदाजे दर कमी होऊन गेल्या आर्थिक वर्षात तीन पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. चालू आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पॅकेजमध्ये जाहीर झालेल्या पाच योजनांचा फायदा सुमारे चार कोटी तरुणांना पुढच्या पाच वर्षांमध्ये होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.