महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न मिळाल्याबद्दल आज लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब कराव लागलं. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी प्रलंबित निधीवरून गोंधळ घातला.
पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना, ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी पश्चिम बंगालमध्ये मनरेगा निधीचा गैरवापर आणि योजनेच्या अंमलबजावणीत अनियमिता असल्याचं सांगितलं. त्यांनी विविध राज्यांना जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती दिली. कामगारांना प्रलंबित वेतन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं.
तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारांना निधी वितरित करण्यासाठी अनुपालन अहवाल सादर करण्याची विनंती केली. मात्र या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला.