मतदार संघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करू न दिल्याच्या निषेधार्थ द्रमुकच्या सदस्यांनी आज सभात्याग केला. लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाली तेव्हा प्रश्नोत्तराच्या तासात द्रमुक सदस्यांनी मतदार संघांच्या सीमांकनाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्द्यावर बोलण्याची परवानगी दिली जाईल, असं सांगितलं.
परंतु, द्रमुक सदस्य त्यांच्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहात आम्हाला मतदार संघांच्या पुनर्रचनेचा मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली नाही. तामिळनाडूमध्ये यावरून अनेक समस्या निर्माण झाल्या असल्यानं या संदर्भात सरकारकडून स्पष्टता हवी आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्या के कनिमोळी यांनी संसदेच्या आवारत बातमीदारांना सांगितलं.