वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ बाबतच्या संयुक्त समितीच्या अहवालावर विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. हा अहवाल आज सभागृहात मांडला जाणार आहे. सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पार्टीसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांना सूचिबद्ध कामकाज सुरु करण्याचं आवाहन केलं. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.
राज्यसभेत आज विरोधकांच्या गदारोळात वक्फ दुरुस्ती विधेयकावरचा संयुक्त समितीचा अहवाल मांडण्यात आला. सकाळी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर भाजपा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी या अहवालाची प्रत वरिष्ठ सभागृहात मांडली. त्यानंतर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली. या गोंधळात सभापती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे त्यांनी सभागृहाचं कामकाज सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं.