वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील.
विधेयकावर ८ तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं त्यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांना सांगितलं. या विधेयकाबाबत कोणत्याही
प्रश्नांची उत्तरं द्यायची सरकारची तयारी आहे, असं सांगून रीजीजू म्हणाले की विरोधी पक्षांना अनुनयाचं धोरण राबवायचं असल्याने ते या विधेयकाला विरोध करत आहेत.
दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार असल्याने भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसनेही आपापल्या खासदारांना आजपासून पुढचे तीन दिवस लोकसभेत हजर राहण्याबाबतचा पक्षादेश काढला आहे.