अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यानं विरोध केलेला नाही, असं केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत सांगितलं. खासदार विशाल पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपरस्थित केला होता, त्यावर जलशक्ती मंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला, त्याला कृष्णा पाणी लवादानं मंजुरी दिली. या प्रश्नावर कोणत्याही राज्याकडून धरणाची उंची वाढवायला विरोध असल्याचा प्रस्ताव दाखल झालेला नाही, असा खुलासा लेखी उत्तरात केला आहे.
कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या धरणाचं पाणी शिरोळ तालुक्यापर्यंत पोहोचणार असून पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे जलमय होऊ शकतात, असा दावा जलतज्ञांनी यापूर्वी केला आहे.