अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज आता सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.
आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करायला सांगितलं. परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
दरम्यान, अदानी उद्योग समूहावरील कथित लाचखोरी आरोपांविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात आज सकाळी निदर्शनं केली. या निदर्शनात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आणि डावे पक्ष सहभागी झाले होते. संसदेच्या संयुक्त समितीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली.