लोकसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. २०२५-२६ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कॉरपोरेट्सना झुकतं माप देण्यात आलं असून जनतेच्या बेरोजगारी, महागाई या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप द्रमुकचे दयानिधी मारन यांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे, अशी टीका त्यांनी केली.
नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला कर सवलत देऊ केली असली तरी गेली पाच वर्ष या सवलतीची मागणी होत होती, असं ते म्हणाले. अर्थसंकल्पात दाखवलेल्या वित्तीय तुटीबद्दल त्यांनी सवाल उपस्थित केले तसंच देशातल्या कृषी क्षेत्राला अनेक समस्या भेडसावत असल्याचंही त्यांनी सभागृहात सांगितलं.
या चर्चेत भाग घेताना भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकूर यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून राष्ट्रीय हिताची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे, असं ते म्हणाले.