डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महायुती आणि मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात

विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज अंतिम होईल, असा विश्वास विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केला. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ३८ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून, तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून, तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे.

 

शिवसेनेनं काल रात्री ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उदय सामंत रत्नागिरीतून, तर दीपक केसरकर सावंतवाडीतून निवडणूक लढवणार आहेत. सुहास कांदे यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातून, प्रताप सरनाईक यांना ओवळा-माजीवड्यातून, तर दादाजी भुसे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही ४५ उमेदवारांची दुसरी यादी काल प्रसिद्ध केली. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिममधून मनसेनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचं आव्हान असणार आहे.

 

महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षानंही काल, अलिबाग, पनवेल, उरण, पेण आणि सांगोला या पाच जागांवर उमेदवारांची घोषणा केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं शीव-कोळीवाडा मतदारसंघातून विजय दळवी यांना उमेदवारी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा