उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, बागेश्वर आणि पिथौरागढ इथं आज मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन होईल असा इशारा डेहराडून इथल्या हवामान विभागानं जारी केला आहे. याठिकाणी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
चमोली जिल्ह्यात ४० हून अधिक गावांवर बर्फाची चादर पसरली असून बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, जोशी मठसह इतर ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जम्मू काश्मीर मध्ये अनेक ठिकाणी झालेलं भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
हिमाचल प्रदेशातही लाहौल, स्पीति, चंबा, कुल्लू आणि किन्नौर इथं मोठी हिमवृष्टी झाली आहे. या भागात ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यानं अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद आहे. सुमारे ५०० मार्ग बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशी सूचना प्रशासनानं दिली आहे.
बिहार मध्ये अचानक आलेल्या पावसानं हवामान बदललं असून ऊन आणि पावसाचा खेळ सुरु आहे. राजधानी दिल्लीत आज हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे